कल्याण गायन समाज
संगीत आणि संस्कृती जतनाचा वसा घेतलेली शतकी संस्था
सुप्रसिद्ध गायक पं. भास्करबुवा बखले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन झालेला कल्याण गायन समाज, गेली जवळपास एक शतक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात एखाद्या दीपस्तंभासारखा उभा आहे. १९२६ साली स्थापन झालेल्या या संस्थेने गेल्या अनेक पिढ्यांतील कलाकार घडवले असून, संगीतसाधना आणि सांस्कृतिक वारसा यांचे संवर्धन करणारी एक पवित्र वास्तु म्हणून स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
संगीताशी संबंधित सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेचे जतन आणि संवर्धन हेच आमचे ध्येय आहे. योजनापूर्वक आयोजित केलेले शैक्षणिक उपक्रम, संगीत मैफिली आणि कलाकारांना दिलेला पाठिंबा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आम्ही एक सशक्त संगीत परिसंस्था निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
अपरिचित नवोन्मेषी प्रतिभेपासून ते लोकप्रिय सुप्रसिद्ध कलाकारापर्यंत प्रत्येकाला, कल्याण गायन समाज व्यासपीठ उपलब्ध करून देत आला आहे. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतातील परंपरा आणि नवसृजन यांचा संगम घडवून त्याचा समृद्ध वारसा पुढे नेण्यासाठी कल्याण गायन समाज सदैव प्रयत्नशील आहे.



































