उन्नत - वाढत्या प्रतिभेसाठी एक व्यासपीठ
उन्नत – परंपरा आणि नवसर्जनाचा संगम
ही कल्याण गायन समाजाची अभिनव दूरदर्शी संकल्पना असून ती भारतीय शास्त्रीय संगीताच्या नव्या पिढीतील कलावंतांना घडविणे आणि त्यांची कला रसिकांसमोर सादर करणे यासाठी समर्पित आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या समृद्ध परंपरेशी घट्ट नातं राखत, उन्नत नवोदित कलाकारांना व्यावसायिक आणि प्रेरणादायी व्यासपीठ उपलब्ध करून देते.
मुळात उन्नत ही केवळ मैफिलींची मालिका नसून एक सांगीतिक चळवळ आहे. तरुण कलाकारांना योग्य संधी, मार्गदर्शन आणि ओळख देऊन, हा उपक्रम भारताच्या शास्त्रीय संगीत परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य करतो.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हा पाया असला तरी उन्नत, उपशास्त्रीय, वाद्यसंगीत, फ्युजन तसेच इतर प्रयोगशील कलाप्रकारातील प्रतिभेचाही तितकाच सन्मान करते. या सर्वसामावेशकतेमुळे परंपरा आणि नवसर्जन यांचा अनोखा संगम घडतो, ज्यातून तरुण कलाकारांमध्ये सहकार्याची भावना आणि सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळते.
आरंभापासून आजपर्यंत उन्नत ने आठ अत्यंत नेटक्या मैफिली यशस्वीरीत्या आयोजित केल्या असून, त्यांना रसिक आणि ज्येष्ठ कलाकारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमांमुळे नव्या प्रतिभेकडे लक्ष वेधले गेलेच, पण एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ असा परस्पर सहकार्यातुन उन्नती साधणारा कलाकारांचा गट निर्माण होतो आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याबाहेरच्या कलाकारांसाठीही कल्याण गायन समाज उन्नतचा विस्तार आणि प्रभाव वाढविण्यास कटिबद्ध आहे.
आम्ही सर्व उदयोन्मुख शास्त्रीय गायक-वादक आणि कलावंतांना उन्नतच्या प्रवासाचा भाग होण्यासाठी मनःपूर्वक आमंत्रण देतो. या मंचावर या, जिथे परंपरा आणि सर्जनशीलता एकत्र येतात, आणि जिथे तुमच्या कलेला खऱ्या अर्थाने जागरूक व रसिक प्रेक्षक मिळतात.








