EN / MR

कल्याण गायन समाज आयोजित देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले पुण्यतिथी,शनिवार २५ एप्रिल २०२६ सायं. ६ वा. कल्याण गायन समाजाचे पांडुरंग प्रभा सभागृह

कल्याण गायन समाज बद्दल

कल्याण गायन समाज स्थापना व उद्दिष्ट
कल्याण गायन समाजाची स्थापना इ.स. १९२६ मध्ये पं. भास्करबुवा बखले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्साही संगीतप्रेमींच्या समूहाने केली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या समृद्ध परंपरेचे जतन व संवर्धन करण्याच्या ध्येयाने स्थापन झालेला हा कल्याण गायन समाज आजही परिसरातील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून कार्यरत आहे.

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक न्यास अधिनियम, १९६० अंतर्गत नोंदणीकृत धर्मादाय न्यास म्हणून कल्याण गायन समाज केवळ रसिकांचे मनोरंजनच करत नाही, तर शास्त्रीय संगीताची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे कार्यही करतो.

आमच्या प्रवासातील महत्वाचे टप्पे

गेल्या ९९ वर्षांत कल्याण गायन समाज महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीताच्या विश्वात एक मुख्य आधारस्तंभ ठरला आहे. अनेक भव्य संगीत महोत्सवांचे आयोजन, संगीत शिक्षणाची परंपरा जपणे आणि या दरम्यान अनेक दैदीप्यमान कामगिरींच्या यशाने नटलेला प्रवास असा समाजाचा गौरवशाली इतिहास आहे.

 
1931

पहिला पंचवार्षिक उत्सव भव्य संगीत महोत्सवाने साजरा.

 
1951

रौप्यमहोत्सवी उत्सवाचे आयोजन.

 
1969

दिनकर संगीत विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन.

 
1976

सुवर्णमहोत्सवी वर्षी नामवंत चित्रकारांच्या सहकार्याने नामांकित संगीत कलाकारांच्या चित्रांची सभागृहात दर्शनी भागात स्थापना.

 
1979–1983

पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, पं. डी. व्ही. पलुस्कर व श्रीमती केसरीबाई केरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वेगवेगळ्या महोत्सवांचे आयोजन.

 
1986

हिरक महोत्सव साजरा

 
1990

दिवाळीच्या पहिल्या दिवशी ‘दिवाळी पहाट’ या नवीन संकल्पने अंतर्गत कार्यक्रम सुरू.

 
1994

दिनकर संगीत विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव.

 
2001

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तीन दिवसीय भव्य शास्त्रीय संगीत महोत्सव; याच महोत्सवात ‘देवगंधर्व महोत्सवाची ’ बीजे पेरली गेली.

कार्यक्रम व परंपरा

Performances by Indian Classical Music Legends

सरत्या शतक भराच्या कालावधीत कल्याण गायन समाजाने भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील बहुतेक सर्व दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यात

  • खाँसाहेब अब्दुल करीम खाँ,
  • उस्ताद फैयाज खाँ,
  • मास्टर कृष्णराव,
  • बडे गुलाम अली खाँ,
  • श्रीमती हिराबाई बडोदेकर,
  • पं. कुमार गंधर्व,
  • पं. भीमसेन जोशी,
  • उस्ताद अली अकबर खाँ,
  • उस्ताद झाकीर हुसेन,
  • पं. हरिप्रसाद चौरसिया,
  • पं. शिवकुमार शर्मा,
  • श्रीमती किशोरी आमोणकर,
  • श्रीमती प्रभा अत्रे,
  • श्रीमती मालिनी राजुरकर

आणि इतर अनेक महान कलाकारांचा समावेश आहे. साहित्यिक, राजकीय नेते, कलाकार, समाजसुधारक अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर रसिकांनी समाजाच्या सांस्कृतिक योगदानाचे कौतुक केले आहे.

उपक्रम व कार्य

तरुण उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देणे व त्यांचा संगीत क्षेत्रातला सहभाग वाढविणे हे समाजाचे महत्त्वाचे ध्येय आहे.

  • वार्षिक शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन स्पर्धा
  • संगीत नाटकांचे प्रयोग – संगीत होनाजी बाळा, ययाती आणि देवयानी, मत्स्यगंधा इत्यादी
  • हजारो ग्रंथ व संगीत मासिकांचे ग्रंथालय
  • १९८७ पासून सुरू असलेले ध्वनिमुद्रण संग्रहालय – विविध घराण्यांच्या कार्यक्रमांचे मौल्यवान संकलन

भावी दृष्टीकोन

कल्याण तसेच डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, टिटवाळा या शहरांच्या झपाट्याने वाढत्या विकासाच्या पार्श्वभूमीवर समाजाने केंद्रीय संगीत अकादमी उभारण्याचे स्वप्न पाहिले आहे. यामध्ये

  • स्वतंत्र सभागृह
  • शास्त्रीय, लोकसंगीत व आधुनिक संगीत संशोधनाची सुविधा
  • अत्याधुनिक ध्वनिमुद्रण केंद्र

यांचा समावेश असेल.

परंपरा व नवोन्मेष यांचा संगम घडविणारे सर्वसमावेशक सांस्कृतिक केंद्र निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.

समाज व पाठबळ

कल्याण गायनसमाजाच्या यशामागे समाजातील नागरिकांचे अखंड पाठबळ आहे. लोकसत्ता दैनिकातील “सर्वकार्येषु सर्वदा” या विशेष मालिकेत आमच्या निधी संकलन उपक्रमांचे कौतुक करण्यात आले आहे. अलीकडेच आमच्या ऐतिहासिक इमारतीचे पुनर्निर्माण सदस्य, नागरिक, व्यावसायिक संस्था व एसबीआयसारख्या कॉर्पोरेट प्रायोजकांच्या उदार योगदानामुळे शक्य झाले.

आमचे लोक

कल्याण गायन समाजाला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व समर्पित समिती सदस्य मार्गदर्शन करतात. यात प्रामुख्याने –

  • व्यावसायिक नेते
  • डॉक्टर, अभियंते, वास्तुविशारद, वकील
  • सनदी लेखापाल
  • प्राध्यापक, कलाकार व माध्यम क्षेत्रातील व्यक्ती

यांचा समावेश आहे. त्यांच्या अनुभव व उत्कटतेमुळे समाजाचे भविष्य उज्ज्वल होत आहे.

आमंत्रण

संगीत व संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आम्ही आमंत्रित करतो. विद्यार्थी, कलाकार, रसिक किंवा समर्थक – तुमच्या सहभागामुळेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची आत्मा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आमचे ध्येय साध्य होईल.

छायाचित्रे